Election 2024 Vasai 133 : वसईला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी मी कटीबद्ध – विजय पाटील
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विजय पाटील यांची बैठक
वसई, ६ नोव्हेंबर २०२४: वसई मतदारसंघातील (Election 2024 Vasai 133) महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचार नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. वसईची मागील ३ दशकात अधोगतीच्या झाली असून वसईला परिवर्तनाची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. वसईतील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच वसईच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल असे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते विजय पाटील यांना महाविकास आघाडी र्फे उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. पाटील यांनी वसईच्या अंबाडी रोड येथील पंचवटी येथील शाखेत आणि चुळणा गावातील रुबी बँक्वीट हॉलमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह प्रचाराचे नियोजन केले तसेच प्रचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि इतर बाबींवर चर्चा केली. यावेळी, कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुकही केले.
आपल्या भाषणात विजय पाटील यांनी वसईच्या विकासावर भर देणार असल्याचे सांगितले. वसईत निसर्गसंपदा असून ज्ञानाच्या, कौशल्याची खाण आहे. येथील नागरिकांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, मात्र मागील तीस वर्षात वसई शहर आणि ग्रामीण भागाची प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे जात आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. बहुजन विकास आघाडीच्या मक्तेदारीमुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. वसई हे स्वत:च्या मालकीचे संस्थान असल्याप्रमाणे वसईला लुटून स्वत:चा विकास करत आहेत, मात्र वसईच्या विकास म्हणजे केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले. वसईला ठाकुरांच्या मक्तेदारीतून बाहेर काढून, विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी मी कटीबद्ध आहे आणि यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे म्हणत विजय पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
या बैठकीस, फादर मायकल जी, काँग्रेसचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऍड. जिमी गोन्साल्विस, सामाजिक कार्यकर्त्या डॉमनिका डाबरे, काँग्रेसचे रामदास वाघमारे, शिवसेनेचे (उबाठा) जेष्ठ नेते विनायक निकम, शिवसेनेचे (उबाठा) जेष्ठ नेते संजय गुरव, शिवसेनेचे (उबाठा) वसई तालुका संघटक राजाराम बाबर, शिवसेनेचे (उबाठा) उप-जिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जगदीश कदम, शिवसेनेचे (उबाठा) जेष्ठ नेते हरिहर पाटील तसेच राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, समाजवादी पक्षाचे कुमार राऊत, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा, संविधान बचाव समितीचे दत्ता धुळे आणि यांसह निर्भय मंचाचे कार्यकर्ते तसेच इतर कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.