Nilesh Sambare – Bacchu Kadu : भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनाच प्रचंड मतांनी निवडून द्या!- बच्चू कडू
Nilesh Sambare – Bacchu Kadu : भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनाच प्रचंड मतांनी निवडून द्या! प्रहार’चे नेते बच्चू कडू यांचे कल्याण-भिवंडीकरांना आवाहन
- कल्याण-आंबिवली येथे चौकाचौकात विजय निर्धार यात्रेचे जल्लोषात स्वागत
- १० आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे , तेव्हा विचार करूनच मतदान करा – बच्चू कडू
कल्याण (प्रतिनिधी) : “ निलेश सांबरे यांच्या प्रचाराला मला येता आलं याचं मी भाग्य समजतो तुम्ही किती आहेत आणि कोण विरोधात आहे हा विषय महत्त्वाचा नाहीये तर आपण किती आहोत आणि काय आहोत हे महत्वाचे आहे. आज खरी परीक्षा उमेदवाराची नाही तर मतदाराची आहे. मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो तेव्हा माझ्या सोबत कोणताच पक्ष नव्हता, कोणताच धर्माचा झेंडा नव्हता की दिल्ली मुंबईचा कोणता मोठा नेता नव्हता.
आपल्यासारखी जनता होती म्हणून बच्चू कडू निवडून आला. हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक कार्यकर्ता आम्ही का निवडून देत नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. “ असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या कल्याण येथील प्रचार सभेत बोलताना केले.
“ काम करणाऱ्या निलेश सांबरे सारख्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मजबुतीने एकत्र या आणि त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा . गरीबांसाठी कानाकोपऱ्यातून लढणारा एक एक माणूस जरी तयार झाला तरी शेतकरी आणि कष्टकरी हा सुखाने झोपेल म्हणूनच निलेश सांबरे सारखी व्यक्ती ही या व्यवस्थेत आली पाहिजे . “ असे सांगत आमदार कडू यांनी निलेश सांबरे यांना निवडून आणण्यासाठी उपस्थित जनतेला आवाहन केले.
“ एक शेतकऱ्याचा मुलगा त्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन उमेदवाराविरुद्ध माझ्यासोबत समविचारी असलेल्या महाराष्ट्रातील अनेक संघटना ,अनेक जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी , शेतकरी बांधव व इतर सर्व समाजाचे तसेच विदर्भ ,मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारोंच्या संख्येने सर्व पदाधिकारी यांच्या ताकतीने मी निवडणूक लढत आहे” असे प्रतिपादन जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष व भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी सभेत बोलताना केले.
दहा वर्षांमध्ये इथे असलेल्या खासदाराने काय काम केलं तर फक्त दिवाळी पहाट आणि गुढीपाडव्या व्यतिरिक्त खासदार कधी या कल्याण नगरीला दिसलेले नाहीत. आणि दुसरे उमेदवार असलेले सुरेश म्हात्रे ( बाळ्यामामा ) हे फक्त फक्त निवडणुकीचा फॉर्म भरायला 2014 ला दिसले होते त्यानंतर 2019 फॉर्म भरतो म्हणून सांगितलं होतं आणि आता 2024 तास निवडणूक व्हायच्या अगोदर तीन महिने आधी शिंदे साहेबांकडून परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेत असे सांगत विरोधकांचा समाचार घेतला .
एका शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं तर तो काय नाही करू शकत ? याचे उदाहरण म्हणजे आज झडपोली सारखा विक्रमगड तालुक्यातील छोट्याशा 200 लोक वस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण दिले जाते. गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे चांगले गुणवत्तेचे शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी उच्च दर्जाच्या शाळा उघडल्या जातात त्याही कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता.
शेतकऱ्यांची शेतमजुरांचे गोरगरिबांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजेत . स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन करून स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे अधिकारी झाले पाहिजेत यासाठी देशातला पहिला प्रयोग जिजाऊ संस्थेने चालू केला आहे. इयत्ता नववीपासून सुरुवात केलेली JEE /NEET CHEE चे क्लासेस ची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे व्हिजन आपल्या जिजाऊचे आहे असे देखील सांबरे म्हणाले .
त्यासाठी गुजरातच्या अहमदाबाद वरून आयआयटी टिचर आपल्या मुलांना चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी बोलावले. कारण आपल्याला आपल्या मुलांना चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण दिले पाहिजे. यातील माझ्या समोरच्या एका जरी उमेदवाराने सांगावे की मी दोन मुलांना शिकवले किंवा दोन-चार विध्यार्थ्यांना माझ्या मुलासारखे शिक्षण दिले आहे. तसेच आरोग्याबाबातही या मतदारसंघात खेळ खंडोबा चालला आहे. कधीतरी त्या खासदारांनी इथल्या सरकारी रुग्णालयात जाऊन बघितले पाहिजे की आमचे बांधव कशा अवस्थेत उपचार घेत आहे. अशा लोकप्रतिनिधींकडून समाजाला काहीच अपेक्षा नाहीत. असे सांगत विरोधकांवर टीकेची झोड उठवली .
सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा एकच प्राणी तो म्हणजे माणूस आणि त्याला कोणी ५०० -१००0 ला विकत घ्यावे इतका आता तो साधा राहिला नाही . त्यामुळे पैशे वाटून मत विकत घेणाऱ्यानी आता याचे भान ठेवावे . तुमच्या आमचे आणि आपल्या मुलाबाळांचे भवितव्य केवळ परिवर्तनाने शक्य आहे आणि ते परिवर्तन निलेश सांबरे यांच्या माध्यमातून होणार आहे. तेव्हा विचार करून मतदान करा असे आवाहन जिजाऊच्या भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख मोनिका पानवे यांनी उपस्थितांना केले. तर संपादक कैलाश म्हापदी यांनी देखील आपल्या भाषणात बोलताना सांगितले सामाजिक काम हे जिजाऊ संघटनेला नवीन नाही हा आमचा दिनक्रम आहे आमची कोणाची स्पर्धा नाही जो आमच्यापेक्षा चांगले काम करेल तो आमचा स्पर्धक असेल .
याप्रसंगी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जिल्हाध्यक्ष मदन दराडे , दानिश एजाज अहमद शेख ज्ञानेश्वरजी सोनवणे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते भाऊ भोईर यांनी आपला जाहीर पाठिंबा या सभेत दिला .सकल मराठा समाजाचे बबन जरांगे पाटील , मराठा सेनेचे रविंद्र कदम यांच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा या वेळेला दिला .
यावेळी मंचावर एमआयएम जनरल सेक्रेटरी अॅड अमोल कांबळे, मंगल कांगणे, अमर कुंडूकर, प्रहार जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, प्रहार ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड स्वप्नील पाटील, खानदेश सेनेचे सुहास बोंडे, शिवाजी काळे (सोलापूर), सकल मराठा समाजाचे बबन जरांगे पाटील आणि रवींद्र कदम, रविश तांडेल, माजी नगरसेवक फैझल जलाल, अपक्ष उमेदवार सुरेश पंडागळे व चंद्रकांत मोटे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मदन दराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते भाऊ भोईर, सलीम जमादार, समीर खान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते .
तत्पूर्वी सांबरे यांच्या प्रचारानिमित्त भव्य प्रचार रॅली देखील आंबिवली-कल्याण शहरातून काढण्यात आली. गाळेगाव येथून प्रारंभ झालेली प्रचार रॅली आरएस टेकडी, जेतवननगर, मोहोने बाजारपेठ, अटाळी, वडवली, शहाड मार्गे कल्याण शहरात आली. पुढे प्रेम ऑटो, भोईरवाडी, साई चौक, बेतुरकर पाडा, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पार नाका, चिराग हॉटेल, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोळीवाडा, आंबेडकर रोड, अन्सारी चौक, डॉन चौक, मछली बाजार, दुर्गाडी किल्ले, आधारवाडी, असे मार्गक्रमण करीत ही रॅली वासुदेव फडके मैदानात पोहोचली.
तेथे तिचे भव्य विजय निर्धार सभेत रुपांतर झाले. रॅली दरम्यान, ठिकठिकाणी निलेश सांबरे यांचे फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. नागरिकांनी हजारोच्या संख्येने गर्दी करीत सांबरे यांना जोरदार पाठींबा दर्शविला तर महिलांनी चौकाचौकात सांबरे यांना औक्षण करीत त्याच्या विजयाची कामना व्यक केली. आबालवृद्ध निलेश सांबरे यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा देतानाचे चित्र पाहायला मिळाले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी १८ मे रोजी देखील निलेश सांबरे यांच्या प्रचारार्थ भिवंडी शहरातून भव्य रोड शो आणि प्रचार सभा घेणार असल्याचे असल्याचे जिजाऊ संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. याप्रसंगी मतदारांना संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.