Lower Parel Bridge: डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे उद्या २३ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकार्पण आणि सरकत्या जिन्यांचे भूमिपूजन
• Lower Parel Bridge : मुंबईकर नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिका वाहतुकीस खुल्या होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी / दक्षिण प्रभाग अंतर्गत ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या (Lower Parel Bridge) पोहोच रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर जिल्हा श्री. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते उद्या गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांची या समारंभास प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्री. आदित्य ठाकरे, आमदार श्री. आशीष शेलार यांच्यासह आमदार श्री. सुनिल शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. त्यासोबतच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू हे असतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, पूल विभागाचे प्रमुख अभियंता श्री. विवेक कल्याणकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती असेल.
दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय असणाऱ्या डिलाईल पुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी सातत्याने निर्देश दिले होते. या प्रकल्पाच्या पूर्ततेवर लक्ष ठेवून कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूल विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रकल्पाच्या ठिकाणी पूल विभागाच्या माध्यमातून वेगाने कामे सुरू होती. संपूर्ण चमूने सातत्याने कामगिरी केल्यानेच पुलाची सर्व कामे करण्यात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
डिलाईल पुलामुळे प्रवास होणार सुखकर
ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. जुन्या पूलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना.म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. नवीन बांधण्यात आलेल्या पुलामध्ये ४ नवीन जिने बांधण्यात येणार आहेत. तसेच २ सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवा मार्गांची रूंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांची वहिवाट पूर्वीपेक्षा सुरळीत होणार आहे.
डिलाईल पुलाच्या बांधणीमध्ये रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर स्थापित करण्याचे काम ऑगस्ट २०२३ महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, पथदिव्याची, सिग्नल यंत्रणा आदी कामे हाती घेण्यात आली होती.
रोमन लिपीतील ‘टी’ आकारात असलेल्या डिलाईल पुलाच्या लोअर परळ स्थानकाच्या पश्चिम दिशेची गणपतराव कदम मार्ग ते ना. म. जोशी मार्ग असा वाहतुकीचा पर्याय देणारी बाजू याआधीच (जून २०२३) महिन्यात खुली करण्यात आली होती. डिलाईल पुलाच्या एका मार्गिकेचे काम दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले. व ती मार्गिका दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. दुसरी मार्गिका देखील पूर्ण झाल्याने उद्या गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ पासून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे.
लोअर परळ पुलाची पूरक माहिती –
१. आयआयटी मुंबईच्या अहवालानंतर पश्चिम रेल्वेने हा पूल वाहतुकीसाठी जुलै २०१८ मध्ये बंद केला.
२. फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे भागातील बांधकाम निष्कासित करण्यात आले.
३. पश्चिम रेल्वेच्या भागात सप्टेंबर २०१९ मध्ये कामाला सुरूवात.
४. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कामाला फेब्रुवारी २०२० मध्ये सुरुवात.
५. पश्चिम रेल्वेमार्फत करीरोडच्या पोहोच रस्त्याच्या दिशेने गर्डर स्थापित करण्याच्या कामाला सुरूवात.
६. जून २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेमार्फत पहिला गर्डर स्थापन करण्यात आला.
७. ऑक्टोबर २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेमार्फत दुसरा गर्डर टाकण्यात आला.
प्रकल्पातील आव्हाने
लोअर परळ पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर स्थापित करणे हे संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. त्यानंतर दक्षिण दिशेकडील भाग हा तोडकामासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये महानगरपालिकेकडे सोपविण्यात आला. पश्चिम रेल्वेने याठिकाणी २२ जून २०२२ रोजी पहिला स्टील गर्डर तर दुसरा गर्डर ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थापित केला. कोविडच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत पुलाचे काम सातत्याने सुरू राहण्यासाठी पूल विभागाच्या चमुने मेहनत घेतली. ऑक्सिजनचा तुटवडा, रेल्वेच्या भागातील कामामध्ये येणारी आव्हाने अशा अनेक अडथळ्यांचा सामना करत या पुलाचे काम वेगाने सुरू राहील यासाठी पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी मेहनत घेतली. पश्चिम रेल्वेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत पश्चिम रेल्वे रूळांवर सुमारे ११०० टन वजनाचे ९० मीटर लांबीचे दोन ओपन वेब गर्डर स्थापित करण्यात आले आहेत.
एन. एम. जोशी मार्ग गणपतराव कदम मार्ग दरम्यानची मार्गिका १ जून २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर पूर्व पश्चिम एक मार्गिकेचा पर्याय १७ सप्टेंबर २०२३ पासून खुला करून देण्यात आला. तर दुसऱ्या मार्गिकेचा पर्याय उद्या गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ पासून वाहनचालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Vasai Virar : ‘सूर्या पाणी योजना` तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देण!