भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रबळ दावेदार मानले जाणारे अपक्ष उमेदवार तथा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे (Nilesh sambare) यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ आता बच्च्चू (भाऊ ) कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षासह विविध कुणबी आणि मुस्लीम समाजाच्या संघटना-राजकीय पक्षांकडून मिळत असलेला वाढत्या पाठींब्याने त्यांची ताकदही वाढली आहे.
प्रारंभीच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तर आता आ. बच्चू कडू यांनीही प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठींबा देत निलेश सांबरे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
दरम्यान, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य, वसई विरार कुणबी अस्मिता संस्था, कुणबी समाज सेवा संघ ठाणे, वसई विरार कुणबी समाज मंडळ या कुणबी समाजाच्या संघटनांनीही पाठींबा दर्शवत सांबरे यांच्या मागे आपली ताकद उभी केली आहे.
शेतकरी संघटना महाराष्ट्र, खानदेश सेना, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (ठाकरे गट), ऑल इंडिया पॅथर सेना, भारतीय परिवर्तन सेना, भारतीय फायटर सेना (BSF) यांनीही सांबरे यांच्यासारख्या प्रचंड सामाजिक काम उभे करणाऱ्या उमेदवाराला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
कूर्मी, कुड्बी, पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासंघानेही सांबरे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदार बांधवांना केले आहे.
मुस्लीम समाजाकडूनही निलेश सांबरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून पीस पार्टीचे डॉ. मोहम्मद अय्युब, खिदमत-ए-खलक फाऊंडेशनचे सलमान अन्सारी यांच्यासह असंख्य मुस्लीम समाजाच्या पक्ष-संघटना पाठींबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्या प्रचारसभांनाही मुस्लीम समाजाकडून, विशेषतः मुस्लीम महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांबरे यांचे शिक्षण, आरोग्य व महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमांचे त्यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.
ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष अनवर शेख, वसई-विरार कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष संतोष वेखंडे यांनीही अलीकडेच निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या कामांनी प्रभावित होऊन पाठींबा देत बहुमतांनी सांबरे याना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
दिवसेंदिवस सांबरे यांना मिळत असलेला पाठींबा वाढतच असून त्यांच्या प्रचाराला देखील गती मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांचा उत्साह हा द्विगुणीत झाला असून हा मिळत असलेला पाठींबा म्हणजेच जिजाऊने संस्थेने आणि संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे मत यावेळी सांबरे यांनी व्यक्त केले.