अमलीपदार्थ तस्करी प्रकरणांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 3 जुलै 2025: राज्यात अमलीपदार्थ तस्करी प्रकरणांमध्ये आता मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके आणि एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा अमली पदार्थ तस्करीमध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यास, त्यांच्या विरोधात आता संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करता येईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले आहे. या युनिटमध्ये विशेष अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही काम करत आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे.
केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यस्तरीय आणि आंतरराज्यीय समन्वय वाढविण्यात आला आहे. इंटेलिजन्स शेअरिंगमुळे आता अनेक राज्यांमध्ये समन्वित कारवाई शक्य झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्ती केंद्रांच्या दर्जात सुधारणा करण्यावरही भर दिला जाणार असून त्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, गांजाची शेती मध्यप्रदेशात कायदेशीर नसून ती महाराष्ट्रातही बेकायदेशीरच राहणार आहे. तसेच गांजा, गुटखा किंवा तत्सम पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.