Naisha Mind Wellness Vasai : कोविडच्या दाहक संकटात स्व. डॉ.हेमंत पाटील यांचं कार्य अतुलनीय – आ. हितेंद्र ठाकूर
‘नायशा मांईड वेलनेस‘ (Naisha Mind Wellness) सेंटरचं उद्घाटन संपन्न
वसई, दि. 11 (प्रतिनिधी) : वसईतील सुप्रसिध्द डॉक्टर हेमंत पाटील यांनी कोविड च्या दाहक संकट काळात वसई-विरार शहरवासियांना अतिशय उत्तम वैद्यकीय सेवा दिली. महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण वसई-विरार क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची रचना, वैद्यकीय मनुष्यबळ, तेथे आवश्यक सुविधा पुरविणे, रूग्ण व्यवस्थापन या सर्वच कामात डॉ.हेमंत पाटील हिरीरीने आघाडीवर राहिले.
दुर्दैवाने त्यांना कोविडची लागण होवून त्यातच त्यांचं निधन झालं. एका प्रकारे कोविड संकट काळात डॉ.हेमंत पाटील यांनी वसई-विरार भागातील जनतेच्या सेवेसाठी आपला देह ठेवला.त्यांचं निधन म्हणजे वसई-विरार भागाची वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात झालेली मोठी हानी असल्याचं प्रतिपादन आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसईत बोलताना केले. स्व.डॉ.हेमंत पाटील यांच्या स्नुषा डॉ.आदिती हिंगे-पाटील यांनी वसईत सुरू केलेल्या ‘नायशा मांईड वेलनेस‘ (Naisha Mind Wellness) या मानसिक आरोग्याबाबत सेवा देणार्या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आ.ठाकूर बोलत होते. डॉ.हेमंत पाटील यांनी इहलोकीची यात्रा संपवून जाताना; कुटुंबासाठी एक मोठा आदर्श वारसा ठेवून गेले आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ.साकेत पाटील (स्त्री रोग तज्ज्ञ) व स्नुषा डॉ.आदिती हिंगे पाटील (सुवर्ण पदक प्राप्त मानसोपचार तज्ज्ञ) हा वारसा समर्थपणे शाश्वत काळ सुरू ठेवतील असा आशावादही आ.ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विदर्भातून आलेल्या डॉ.हेमंत पाटील यांनी वसईला कर्मभूमी मानलं. येथील लोकांना आरोग्याच्या संदर्भात उत्तमोत्तम सेवा दिली व वसईकरांनी त्यांना आपल्यात सामावून घेतलं. लोकांना आपलसं कसं करावं हे डॉ.पाटील कुटुंबाकडून शिकण्यासारखं असल्याचं आ.ठाकूर यांनी म्हटलं. नव्याने सुरू होत असलेल्या ‘नायशा मांईड वेलनेस‘ वसईकरांना मानसिक आरोग्याबाबतची उत्तमोत्तम सेवा मिळेल असा आशावाद व्यक्त करत त्यांनी या उपक्रमास शुभाशिर्वाद दिले.
‘नायशा माईंड वेलनेस क्लिनिक‘ हे स्व. डॉ हेमंत दा. पाटील वसई पारनाका येथे ज्या जागी वैद्यकीय व्यवसाय करत होते तिथे सुरु झाले आहे. डॉ. अदिती हिंगे पाटील या स्व. डॉ हेमंत पाटील यांची स्नुषा आहे. या वास्तूत डॉ हेमंत पाटील यांनी अनेक रुग्णांना बरे केले. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा बरा होत असे, अशी आठवण या प्रसंगी माजी महापौर प्रवीण शेट्टी व माजी उपनगराध्यक्ष संतोष वळवईकर यांनी करून दिली. मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि मानसोपचार तज्ज्ञ तथा समुपदेशक यातील फरक डॉ अदिती हिंगे पाटील यांनी आपल्या भाषणात अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केला.
या क्लिनिक मध्ये ‘सायकीयाट्रीस्ट‘ आणि ‘सायकोलॉजीस्ट‘ यांची एक व्यावसायिक टीम एकत्रितपणे काम करणार असून त्याचा उपयोग मानसिक आरोग्य नीट राखण्यास होणार आहे. सोबतच लहान मुलांसाठी ‘प्ले थेरेपी‘ सोबत ‘योगा‘ आणि ‘मेडिटेशन‘ सारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत आणि पुढे ‘ऑक्युपेशनल थेरेपी‘ देखील नजीकच्या काळात सुरु करण्यात येणार आहे. मानसिक आरोग्याबाबत सेवा देणारा वसईतील हा बहुधा पहिलाच मोठा प्रयोग असणं शक्य आहे.
या प्रसंगी माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष अजय खोकाणी, माजी उपनगराध्यक्ष सागर महांबरे, वसई विकास बँकेचे माजी अध्यक्ष जगदीश राऊत, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आशय राऊत, संचालक राजू पाटील, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा वसई जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संदेश जाधव, विरारचे माजी नगराध्यक्ष मुकेश सावे आणि बहुजन विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या ‘क्लिनिक‘ चा चांगला उपयोग सर्वच नागरिकांना होऊन स्व. डॉ हेमंत पाटील यांचे स्वप्न पूर्ण होईल असे डॉ साकेत पाटील यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले.