वसई-विरारमराठी न्यूज़

Dialysis unit in Nalasopara : नालासोपारा मध्ये नवीन डायलेसिस विभागाचे उद्घाटन 

विरार : (Dialysis unit in Nalasopara) स्व. तारामती व हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट, विरार यांनी,  दुस-या २० नवीन मशीनची खरेदी केली असून त्यातील, ६ मशीनचा स्वतंत्र विभाग, मा. उपमहापौर उमेश नाईक यांच्या, तुळींज एज्युकेशन ट्रस्ट मार्फत,  के. एम, पी. डी हायस्कूल, तुळींज रोड, नालासोपारा (पूर्व) येथे १५ ऑगष्ट २०२४ रोजी सुरु करण्यांत येणार आहे, तरी या कार्यक्रमास गरजू रुग्ण व नातेवाईकानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यांत येत आहे.

त्याच बरोबर त्या विभागातील रुग्णांची गरज बघून, लवकरात लवकर एकूण १० मशीनचा हा विभाग कार्यरत असेल. विरार मधील ठाकूर आर्केड या इमारतीत १२ मशीनचा विभाग २९ ऑगष्ट २०२४ पासून सुरु होणारा असून, ग्रामीण भागातील रुग्णासाठी शिरसाड फाटा येथे नव्याने डायलेसिस विभाग लवकरच सरू होणार असून गरजू रुग्णांनी याचा फायदा होईल.
दैनैदिन जीवनातील धावपळ व दगदग, प्रदूषण, व आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणामामुळे दररोज वाढणारे किडणी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावरील उपचार म्हणजे किडनी बदलणे किंवा नियमित डायलेसिस हे उपाय करणे गरजेचे असते. परंतु हे खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसतात. अशा लोकांसाठी  स्व. तारामती व हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट, विरार,  मार्फत येत्या दोन वर्षाचे आत एकूण १०० डायलेसिस मशीन, (Fresnis Haemodialysis ) या नामवंत जर्मन कंपनीच्या मशीन खरेदी करून, पालघर जिल्ह्यातील किडणी निकामी झालेल्या असंख्य रुग्णांना दिलासा देण्याचा संकल्प वसई तालुक्याचे लाडके आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्याच बरोबर अशा डायलेसिस रुग्नासाठी कार्य करू इच्छिणा-या सेवाभावी संस्थाना विवा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत प्रायोजक तत्वावर  डायलेसिस मशीन खरेदी करून दिल्या जातील, म्हणून  अशा संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन स्व. तारामती व हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट,चे संस्थापक दीपक ठाकूर यांनी केले आहे.
सध्या सन २०१२ पासून या ट्रस्टने विरार येथे डायलेसिस विभाग सुरु केला असून, या ठिकाणी एकूण २१ मशीन कार्यरत आहेत व दररोज ६३ लोकांचे डायलेसिस फक्त रु. ४००/- मध्ये केले जात असते. या रक्कमे मधून वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत राहणा-या नागरिकांना रु. ३५०/- आर्थिक मदत आपली महागरपालिका नियमित करीत आली आहे. म्हणजेच येथे उपचार घेणा-या डायलेसिस रुग्णांना रु. ५०/- अशा नाममात्र रक्कमेमध्ये ही सेवा उपलब्ध होत आहे, ही सेवा उपलब्ध करून देत असतांना रुग्णाला डायलेसिस, डायलेझर, ट्युबिंग, आय. व्ही. सेट, इंजेक्शन, डॉक्टर फी, या सर्व सोयी संस्था पुरवीत असते. त्या शिवाय या रुग्णांना डायलेसिस करतांना थकवा जाणवू लागतो, त्यामुळे त्यांना तातडीने पौष्टिक नास्ता देणे अत्यंत गरजेचे असते, ती व्यवस्था सुध्दा संस्था नियमित करीत आली आहे.
 ही सेवा पुरवीत असताना एका मशीनच्या किंमतीसह किमान रु १० ते ११ लाखाचा खर्च अपेक्षित असतो. त्या शिवाय डायलेसिस देत असताना दर डायलेसिस साठी रु. ९०० ते १००० पर्यंत खर्च प्रत्येक रुग्णास प्रत्येक डायलेसिसाठी येत असतो. हा सर्व खर्च स्व. तारामती व हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट, गेल्या बारा वर्षा पासून करीत आली आहे.  त्या करिता  ताराबेन तलाक्षी धारोड आणि कुटुंबीय, शौकीन जैन, सुरेश दुग्गड, बिसमिल्ला इब्राहीम शेख, चेतन देसाई, सजेश चौधरी  अशा अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांचे यथा योग्य सहकार्य लाभत आहे. विशेषतः साई पालखी निवारा शिर्डी. श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, श्री ओम साईधाम मंदिर ट्रस्ट विरार, कै. यशवंत स्मृती ट्रस्ट, डिवाईन स्कूल नालासोपारा, बालाजी ट्रस्ट बोळींज, उत्सव हॉटेल विरार, शनी मंदिर ट्रस्ट वाघोली, हायटेक सिस्टीम मुंबई, श्री मंगलमूर्ती ट्रस्ट, स्वयंभू ट्रस्ट बोळींज, आणि विवा चॅरिटेबल ट्रस्ट अशा विविध ट्रस्ट आप-आपल्या परिने योगदान देवून सहकार्य करीत असतात.
या विभागाचे संचलन संजीवनी हॉस्पिटल विरार, हे डॉ. चैत्यन्न सांवत यांचे देखरेखीखाली करीत असून, निदान डायग्नोसिस सेंटर, प्रकृती हॉस्पिटल बोळींज, सिध्दी हॉस्पिटल विरार, साई संजीवनी कार्डीयाक सेंटर विरार आणि सुशिला हॉस्पिटल विरार यांचे सहकार्य लाभणार आहे. जे गरीब रुग्ण असतील अशा रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजूर करून घेण्यास संस्था प्रयत्नशील आहे.
अशा असंख्य रुग्णांना जीवदान देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतरूप व्हावे असे आव्हान सन्स्थेचे अध्यक्ष श्री आजीव पाटील यांनी केले असून, सौ. हेमा ठाकूर मॅनेजिंग ट्रस्टी, ह्या  एकूण ४३ मुलींच्या निराधार व गरीब मुलींसाठी शारदा माता विद्याश्रम न्यासचा कार्यभार व विवा कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे यशस्वी संचालन दररोज वेळ देवून जातीने लक्ष देत आहेत. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन या डायलेसिस विभागास सुध्दा लाभत आहे.
Show More

Related Articles

Back to top button